२० फूट जमिनीत गाडलेलं शरद पवारांचं राजकारण अमित शहा पुन्हा उकरणार?
जे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही झालं नाही, असं राजकारण आता महापालिकांच्या निवडणुकांत होऊ पहात आहे. जेव्हा महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि तीन वेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले, तेव्हा असं म्हटलं गेलं की सामान्यांचा राजकारणावरील विश्वास उडावा, असे बदल आता होत आहेत. हीच परंपरा पुढं सुरू राहून आणखी वेगळी युती पहायला मिळू लागली आहे, ती ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात आणि तीही थेट दिल्लीहून... ज्यांना “भ्रष्टाचाराचे सरदार” म्हणत टीका केली. ज्यांचं राजकारण “जनतेनं २० फूट खोल जमिनीत गाडलं,” असं म्हटलं गेलं, त्याच शरद पवार यांच्यासोबत युती करण्यात हरकत नसल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटल्याचं सांगण्यात येतं. लोकसभा आणि विधान सभा निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात येऊन शरद पवार यांच्यावर सडकून टीका केलेले अमित शहा यासाठी कसे तयार होत आहेत, हा प्रश्नच आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती करण्याचं घाटत आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीची भाजपसोबत युती आहे. त्यामुळं पटेल आणि तटकरे यांनी या नव्या युतीचा विषय शहा यांच्या कानावर घातला. यावर चर्चा झाली. त्यावेळी अशी युती करण्यास शहा यांची काहीच हरकत नसल्याचं सांगण्यात आलं. तर दुसरीकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबतची युती तुटत असल्याचं पुण्यात सांगितलं होतं. त्यावरही चर्चा झाली. यावर शहा यांनी या सर्वच विषयांवर भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांसोबत बोलणार असल्याचं पटेल आणि तटकरे यांना आश्वासन दिल्याचं सांगण्यात येतंय.
शरद पवार यांच्या पक्षासोबत युती करण्यास शहा यांनी हिरवा झेंडा दाखविणं ही मोठी गोष्ट यानिमित्तानं पुढं आली आहे. कारण मागील निवडणुकांमध्ये शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शरद पवार यांच्य़ावर सडकून टीका केली होती. पुण्यातील एका सभेत बोलताना शहा यांनी पवार यांना “भ्रष्टाचाऱयांचे सरदार” म्हटलं होतं. यावेळी अजितदादा व्यासपीठावर उपस्थित होते. त्यानंतर भाजपच्या शिर्डी इथं झालेल्या अधिवेशनातही शहा यांनी पवार यांच्यावर टीका केली होती. शहा म्हणाले होते, “१९७८ पासून शरद पवारांनी दगाफटक्याचं राजकारण सुरू केलं होतं, ते आता २० फूट जमिनीमध्ये गाडण्याचं काम जनतेनं केलं.”
आणि आता त्याच पवारांच्या पक्षासोबत युती करण्यास शहा यांचा हिरवा झेंडा आहे. जनतेनं गाडलेलं राजकारण पुन्हा उकरलं जाणार का?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा