आटपाडी ता.१- केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना सन्माननिधी देऊन अल्प प्रमाणात सन्मान केला आहे मात्र यात साठ वर्षांवरील ज्येष्ठांचा कुठेच विचार केला नाही. देशात आणि राज्यात ज्येष्ठांची 25% वर लोकसंख्या आहे. जर का पेन्शन देणार नसाल तर सत्ताधार्यांना घरात बसवू असा खणखणीत इशारा देऊन राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांसह साठ वर्षांवरील ज्येष्ठांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन द्यावी, यासाठी जनता दलाने मंगळवार ता. ११ रोजी तहसील कार्यालयावर आयोजित केलेल्या मोर्चात शेतकरी आणि ज्येष्ठानी सहभागी होण्याचे आवाहन जनता दलाचे तालुका अध्यक्ष आबासो सागर यांनी केले आहे. माजी आमदार शरद पाटील, माजी आमदार रामहरी रुपनवर आणि माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाला जत, आटपाडी, खानापूर, माण, खटाव आणि सांगोला तालुक्यात गाव गावी बैठका घेऊन प्रबोधन सुरू केले आहे. या भागातून मोठ्या संख्येने जेष्ठ मंडळी मोर्चा सहभागी होणार आहेत. गेली 13 वर्षाचे वयोवृद्धांच्या पेन्शन साठी लढा उभारल्यामुळे केंद्र सरकारने मागील चार वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये पेन्शन सुरू केली आहे.
त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये सन्मान निधी जाहीर केला आहे .
मात्र केंद्र आणि राज्याने साठ वर्षावरील ज्येष्ठ आणि वृद्धांचा विचार केला नाही. हे खरोखरच दुर्दैव आहे. गेली तेरा वर्षे आमचा लढा सुरू असून आम्ही तो तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणूनच केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांसह वयोवृद्धांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन स्वरूपात द्यावेत अशी आमची मागणी आहे. या मोर्चात नाथाभाऊ शेवाळे,जनार्दन गोंधळी, जगन्नाथ माने, रघुनाथ रास्ते,रामचंद्र कोळेकर, माणिकराव पांढरे, बाजीराव पाटील, बाळासाहेब माळी, तुकाराम माळी आदी सहभागी होणार आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा