आटपाडी ता.१९- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळसौदे बाजारात डाळिंब, पेरू, चिकू आणि सीताफळा पाठोपाठ ड्रॅगन फ्रुटचाही लिलाव बाजार सुरू झाला. आडतदार पंढरीनाथ नागणे यांच्या मंगलमूर्ती फ्रुट अडतीवर झालेल्या ड्रॅगन फ्रुटच्या लिलावात उच्चांकी प्रति किलो 121 रुपये भाव मिळाला. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सौदे बाजारात गेली पंधरा वर्षे डाळिंबाचा सौदे बाजार सुरू आहे. सुरुवातीला आठवड्यातून तीन वेळा डाळिंबाचा सौदे बाजार होत होता. आवक वाढत गेल्याने यामध्ये बदल करून आठवड्यातील शनिवार वगळता सहा दिवस बाजार सुरू केला. व्यापाऱ्यांची संख्याही वाढत गेली. त्यामुळे मंगलमूर्ती फ्रुट सेंटरचे मालक पंढरीनाथ नागणे यांनी सफरचंदाचा लिलाव बाजार सुरू केला. साधारण हा बाजार डाळिंबाबरोबरच तीन महिने चालतो. गेल्या दोन-तीन वर्षात डाळिंब आणि सफरचंदाच्या जोडीला चिक्कू, पेरू आणि सीताफळाचाही बाजार सुरू केला आहे. तालुक्यात टेंभूचे पाणी आल्यामुळे इतर फळबागांचे क्षेत्र वाढत चालले आहे. त्यामुळे त्या फळाच्या विक्रीची समस्या निर्माण होण्याअगोदरच आटपाडीच्या बाजार समितीच्या सौदे बाजारात बाजार सुरू झाल्याने विक्रीची समस्या सुटली आहे. पेरू चिकू आणि सीताफळाची आवक हंगामात दरवर्षी वाढत चालली आहे. यंदा पहिल्यांदाच सौदे बाजारात पंढरीनाथ नागणे यांच्या अडतीवर ड्रॅगन फ्रुटचा लिलाव नुकताच झाला. महूद ता. सांगोला येथील शेतकरी वैभव वसंत लवटे यांनी ड्रॅगन फ्रुट लिलावासाठी बाजारात आणले होते. लिलावात 1 नंबर च्या फळाला प्रति किलो 121 रु आणि 2 नंबर प्रतीला प्रति किलो 111 रुपये दर मिळाला. आटपाडी, जत,माण, खटाव, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा, पंढरपूर, जत या भागातील शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रुट सीताफळ पेरू लिलावासाठी घेऊन येण्याचे आवाहन केले आहे.
याच बाजारात माण तालुक्यातील शिंगणापूर येथील अजय काटे यांच्या डाळिंबाला 251, 121, व 81 असा दर मिळाला तर नातेपुते येथील बाबुराव पानसकर यांच्या डाळिंबाला 210, 120, 85, 55 असा दर मिळाला. या सौदे बाजारात डाळिंबाबरोबरच इतर फळ पिके आणून वाढलेल्या दराचा लाभ घ्यावा असे आव्हान बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा