मुख्य सामग्रीवर वगळा

आटपाडीच्या राजकारणात मोठी उलथापालथ: आमदार सुहास बाबर आणि राजेंद्रअण्णा देशमुख यांची 'महायुती' जाहीर; भाजपसमोर तगडे आव्हान!


आटपाडी (प्रतिनिधी): आटपाडी तालुक्याच्या राजकारणात आज एक अत्यंत खळबळजनक आणि महत्त्वाची घडामोडी घडली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आमदार सुहास बाबर (शिवसेना) आणि माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी ऐतिहासिक युतीची घोषणा केली आहे. या नव्या समीकरणामुळे तालुक्यात भाजपसमोर मोठे राजकीय आव्हान उभे ठाकले असून राजकीय वातावरण पूर्णपणे तापले आहे. *विकासासाठी आणि प्रगतीसाठी एकत्र: आमदार सुहास बाबर*
यावेळी बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले की, "तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रीतसर परवानगी घेऊनच ही युती करण्यात आली आहे. एकत्र काम केल्याने तालुक्याची प्रगती अधिक वेगाने होईल. आम्ही ही युती केवळ निवडणुकीपुरती मर्यादित न ठेवता, अगदी ग्रामपंचायत स्तरापर्यंत कायम ठेवण्याचा प्रयत्न करू."
विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना बाबर पुढे म्हणाले, "आमच्यावर घराणेशाहीचे आरोप करणाऱ्यांना तसा कोणताही नैतिक अधिकार नाही. राजकारणात वयापेक्षा कर्तृत्व महत्त्वाचे असते. जर आम्ही नगरपंचायतीला एकत्र असतो, तर आज चित्र वेगळे दिसले असते. आमचा विजय निश्चित आहे.        *राष्ट्रवादी आणि शिवसेना ताकतीने लढणार: राजेंद्रअण्णा देशमुख*
माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी या निर्णयाचे समर्थन करताना सांगितले की, "आमदार सुहास बाबर यांनी गेल्या काही काळात तालुक्यात उत्तम काम केले आहे, म्हणूनच त्यांना साथ देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना ही निवडणूक पूर्ण ताकतीने लढवणार आहे."
आरक्षणाच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना देशमुख म्हणाले, "शासकीय नियमानुसार आरक्षण पडले असले, तरी आम्ही सहा ठिकाणी खुल्या प्रवर्गाच्या जागांवर ओबीसी उमेदवार दिले आहेत. आम्ही कोणत्याही समाजावर अन्याय केलेला नाही. आम्ही जातीवर आधारित नव्हे, तर निवडून येण्याची क्षमता हा निकष लावून उमेदवार दिले आहेत *भाजपच्या गोटात अस्वस्थता?*
बाबर आणि देशमुख या दोन मातब्बर नेत्यांनी हातमिळवणी केल्यामुळे आटपाडी तालुक्यातील राजकीय गणिते पूर्णपणे बदलली आहेत. आतापर्यंत एकमेकांचे प्रतिस्पर्धी मानले जाणारे हे गट एकत्र आल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. या युतीमुळे आगामी निवडणुकीत 'बॅटल ग्राउंड' अधिक रंजक होणार आहे.
*दिग्गजांची उपस्थिती*
या ऐतिहासिक घोषणेवेळी तानाजीराव पाटील, सभापती संतोष पुजारी, विनायक मासाळ, अनिल पाटील, दत्ता पाटील, अशोक देशमुख, श्रीरंग कदम, विठ्ठल गवळी, अमोल मोरे, सोमनाथ देवकर, सत्यशिल सवने, यांसह दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पण्या