शेटफळे (प्रतिनिधी) करगणी जिल्हा परिषद गटातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार विनायक मासाळ यांच्या प्रचारार्थ शेटफळे गावात काढण्यात आलेल्या 'संवाद फेरी' आणि 'संवाद बैठकी'ला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गावातील प्रमुख चौक आणि वस्त्यांवर विनायक मासाळ यांनी स्वतः जाऊन मतदारांशी संवाद साधला.
प्रचाराचा भाग म्हणून गावात भव्य संवाद फेरी काढण्यात आली होती. यावेळी विनायक मासाळ यांनी कार्यकर्त्यांसोबत बाजार पटांगण, नेताजी चौक, जोगेश्वरी चौक, करगणी कॉर्नर आणि अकरावर अशा विविध भागांत थांबून नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. विशेषतः कट्ट्यांवर आणि चौकांमध्ये बसलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी त्यांनी संवाद साधून त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी ज्येष्ठांनीही मासाळ यांना मोलाच्या सूचना आणि शुभेच्छा दिल्या.
*पाटील मळा येथे रंगली संवाद बैठक*
संवाद फेरीनंतर शेटफळे येथील पाटील मळा येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विनायक मासाळ यांनी गावकऱ्यांसमोर विकासाचा 'रोडमॅप' मांडला. "गावाचा सर्वांगीण विकास आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे," असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. शेतकरी आणि युवकांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी सकारात्मक चर्चा केली.
या बैठकीला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी आणि शिवसेना संपर्कप्रमुख साहेबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या नेत्यांनी महायुतीच्या माध्यमातून होणाऱ्या विकासकामांची माहिती ग्रामस्थांना दिली.
शेटफळे परिसरातील शेतकरी, युवक आणि कार्यकर्त्यांनी या बैठकीला मोठी गर्दी केली होती. थेट संवाद आणि विकासकामांवरील चर्चा यामुळे ग्रामस्थांमध्ये विनायक मासाळ यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण दिसून आले. या संवाद फेरीमुळे करगणी गटात महायुतीच्या प्रचाराने मोठी आघाडी घेतली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा