आटपाडी ( प्रतिनिधी). "निंबवडे जिल्हा परिषद गटातील शिवसेनेच्या उमेदवार अँड. विद्याताई मोटे यांचे काम केवळ राजकीय नसून ते सामाजिक आणि शैक्षणिक बांधिलकीतून उभे राहिले आहे. उच्चशिक्षित असलेल्या विद्याताईंनी विशेषतः विद्यार्थी वर्गासाठी दिलेले योगदान उल्लेखनीय असून, त्यांचे हे कार्यच त्यांची खरी ओळख आहे," असे ठाम प्रतिपादन आमदार सुहास बाबर यांनी येथे केले.
आटपाडी येथे शिवसेनेच्या मेळाव्यात नंतर आयोजित एका पत्रकार परिषदेत आमदार बाबर बोलत होते. यावेळी त्यांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत युतीची घोषणा करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. *कर्तृत्ववान आणि सुशिक्षित चेहरा*.
विद्याताई मोटे यांच्या कार्याचा गौरव करताना आमदार बाबर म्हणाले की, "ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, शैक्षणिक मदत पुरवणे आणि महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी सातत्याने जमिनीवर राहून काम केले आहे. शिक्षण, आरोग्य आणि स्थानिक समस्या सोडवण्याचा त्यांना दीर्घ अनुभव आहे. निंबवडे गटात त्यांना मिळणारा जनसामान्यांचा पाठिंबा हा त्यांच्या याच व्यापक संपर्काची पावती आहे."
*विकासासाठी 'महायुती' सज्ज*.
शिवसेना-राष्ट्रवादी युतीबाबत स्पष्टीकरण देताना आमदार बाबर म्हणाले, "ही युती केवळ निवडणुकांसाठी नसून ती विकासाभिमुख विचारांची आहे. पाणीपुरवठा, रस्ते आणि शेतकरी हिताचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी दोन्ही पक्षांची ताकद आता एकत्र आली आहे. आटपाडी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी ही युती सक्षम पर्याय ठरेल. *"विरोधकांकडे केवळ टीका, आमच्याकडे विकास!*
विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना आमदार सुहास बाबर यांनी जोरदार टोला लगावला. ते म्हणाले की, "विरोधकांकडे सांगण्यासारखे काहीच नसल्याने ते केवळ टीकेचे राजकारण करत आहेत. मात्र, आमच्याकडे विकासाची ठोस कामगिरी आणि पायाभूत सुविधांचा लेखाजोखा आहे. निंबवडे गटासह संपूर्ण तालुक्यात केलेल्या कामाच्या जोरावर युतीला या निवडणुकीत ऐतिहासिक यश मिळेल, यात शंका नाही."
आटपाडी तालुक्यातील निवडणुकीचे वातावरण तापले असून, विद्याताई मोटे यांच्या उमेदवारीने आणि नव्या युतीने निंबवडे गटात विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा