झरे ता. आटपाडी येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत झालेल्या कोट्यवधीच्या सोने आणि चांदीच्या दागिने चोरीचा छडा लावण्यात सांगली गुन्हे अन्वेष विभागातील पोलिसांना यश आले आहे. मोठा आव्हानात्मक तपास असलेल्या चोरीचा अवघ्या तेरा दिवसांत पोलिसांनी तपास करत उत्तर प्रदेश आणि स्थानिक जिल्ह्यातील चार आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल ३ कोटी २५ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सात जानेवारी रोजी रात्री चोरट्यांनी झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा पाठीमागील खिडकीचे गज गॅस कटरने कापून बँकेत प्रवेश केला. त्यानंतर लॉकर रुममधील तब्बल २२ लॉकर्स गॅस कटरच्या साहाय्याने तोडून त्यातील ग्राहकांचे सोने-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली. आरोपींनी स्वतःचे अस्तित्व लपवण्यासाठी बँकेतील सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील सोबत नेहला होता. आरोपींनी स्वतःची ओळख लपवण्यासाठी बरीच खबरदारी घेतली होती. त्यामुळे पोलिसासमोर या चोरीचा तपास लावण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. मात्र, तपास पथकाला काही गुप्त माहिती मिळाली. पलूस येथील एका लॉजवर 7 ते 8 दिवस उत्तर प्रदेशमधील काही व्यक्ती स्थानिक साथीदारांच्या मदतीने राहत होत्या.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास केला. त्यात विश्वजीत विजय पाटील (रा. बांबवडे, ता. पलूस) याचे उत्तर प्रदेशमध्ये गलाईचे दुकान होते. त्याच्या ओळखीच्या राहुल शर्मा (रा. ककराला, जि. बदायु, उत्तर प्रदेश) याने आपल्या इतर साथीदारांना घेऊन ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक आरोपी संकेत अरुण जाधव (रा. बलवडी, ता. खानापूर) आणि इजाज राजु आत्तार (रा. आमनापूर, ता. पलूस) यांनी चोरीसाठी लागणारे साहित्य पुरवण्यास मदत केल्याचे तपासात उघड झाले.
पोलिसांनी आरोपींकडून सोन्या चांदीच्या दागिन्यासह तब्बल सव्वा तीन कोटीचा माल हस्तकत केला आहे.
यात १.१६८ किलोग्रॅम वजनाची सोन्याची लगड, १,५७,६८,००० रुपये किंमतीची,
२८.५०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व देवाचे मुखवटे (किंमत ८७,००,००० रु.),
५०३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (किंमत ७०,००,००० रु.)
चोरीसाठी वापरलेली चारचाकी गाडी.गावठी बनावटीचा कट्टा व ४ जिवंत राऊंड तसेच
रोकड ५१,६०० रूपये असा तीन कोटी २५ लाख ५४ हजार ६०० रुपये.
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहा ्पोलीस निरीक्षक पंकज पवार, सहा. पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर आदींच्या पथकाने अत्यंत कौशल्याने आणि जलदगतीने हा तपास करून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला. या कामगिरीबद्दल पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा