आटपाडी ता. 28- निवडणुकीच्या रणधुमाळीत करगणीत भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक ४ मधील भाजपाच्या तीन विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत आज शिवसेनेचा भगवा हाती घेतला. या पक्षप्रवेशामुळे करगणीत शिवसेनेची बाजू अधिक भक्कम झाली आहे.यांनी केला शिवसेनेत प्रवेश:
सलग तीन वेळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले गावातील प्रभावी नेते उत्तम माने, विद्यमान सदस्य अभिजित जाधव, आणि आण्णा कांबळे व त्यांच्या पत्नी ग्रामपंचायत सदस्या सौ. रूपाली आण्णा कांबळे यांनी भाजपला रामराम ठोकला.
नाराजीचे नेमके कारण काय?
"ग्रामपंचायत आणि वरिष्ठ स्तरावर भाजपमध्ये कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत. प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याकडे सरपंच आणि पक्षाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे," असा आरोप प्रवेशकर्त्या सदस्यांनी केला आहे. विकासाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या या तीव्र नाराजीमुळेच त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.महायुतीच्या उमेदवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीचे करगणी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार विनायकराव मासाळ आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी दोन्ही उमेदवारांनी नवीन सदस्यांचे पक्षात स्वागत करून त्यांच्या प्रभागातील प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
गेल्या काही दिवसांपासून करगणीत भाजपला रोज खिंडार पडत असून, दुसरीकडे शिवसेनेकडे तरुण, महिला आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा ओघ वाढला आहे. या बदलत्या समीकरणामुळे करगणी गटात महायुतीच्या उमेदवारांना मोठे मताधिक्य मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा