आटपाडी (प्रतिनिधी):निंबवडे जिल्हा परिषद गटातील भाजपाच्या उमेदवार माधवीताई पडळकर यांनी प्रचाराचा वेग वाढवला असून, पारेकरवाडी येथे त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या. याभेटींच्या माध्यमातून त्यांनी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवतींशी मनमोकळा संवाद साधला. गावातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याच्या त्यांच्या या 'कोअर' प्रचार पद्धतीची सध्या संपूर्ण निंबवडे गटात जोरदार चर्चा रंगली आहे. *महिला आणि तरुणांच्या प्रश्नांवर चर्चा* गृहभेटी दरम्यान पारेकरवाडीतील महिलांनी पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, रस्ते आणि स्वच्छतेच्या समस्या मांडल्या. यावर बोलताना माधवीताईंनी महिला बचत गटांना प्रोत्साहन आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तर, गावातील युवतींनी शिक्षण आणि कौशल्य विकासाबाबत आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. ज्येष्ठ नागरिकांनीही त्यांच्या अनुभवातून गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
*पडळकर कुटुंबाच्या कार्यावर मतदारांचा विश्वास*
यावेळी ग्रामस्थांनी आमदार गोपीचंद पडळकर आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी तालुक्यात केलेल्या कामांचा आवर्जून गौरव केला. "रस्ते, पाणी योजना आणि शैक्षणिक सुविधांच्या बाबतीत पडळकर बंधूंनी परिसरात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. तोच विकासाचा वारसा माधवीताई सक्षमपणे पुढे नेतील," असा ठाम विश्वास पारेकरवाडीतील नागरिकांनी व्यक्त केला.सर्वसामान्य जनता हीच माझी ताकद - माधवीताई पडळकर
मतदारांशी संवाद साधताना माधवीताई पडळकर म्हणाल्या की, "मतदारसंघातील सर्वसामान्य जनता आणि माता-भगिनी हीच माझी खरी ताकद आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पडळकर कुटुंबाने जनसेवेचे जे व्रत हाती घेतले आहे, त्याला अधिक गतीने पुढे नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे. निंबवडे गटाचा कायापालट करणे हेच माझे मुख्य ध्येय आहे."
पारेकरवाडीतील या यशस्वी पदयात्रेमुळे आणि घरोघरी मिळालेल्या प्रतिसादामुळे निंबवडे गटात भाजपचे पारडे जड होताना दिसत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा