आटपाडी -विरोधकांना मी निंबवडे गटातच अडवून ठेवले आहे. त्यामुळे आटपाडी तालुक्यातील राहिलेले तीन गट मोकळे झाले आहेत. त्यामुळे आटपाडी तालुक्यात चारही जिल्हा परिषदेचे आणि आठ पंचायत समितीचे सदस्य शिवसेनेचेच निवडून येणार असा विश्वास साध्य फाउंडेशनच्या अध्यक्षा विद्याताई मोटे यांनी व्यक्त केला. आटपाडी
येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी आमदार सुहास बाबर आणि जिल्हा बँक संचालक तानाजीराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी निंबवडे जिल्हा परिषद गटाच्या नेत्या तथा शिवसेनेच्या उमेदवार विद्याताई मोटे यांनी अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. आटपाडी तालुक्यातील पहिलाच संवाद मेळावा असल्याचे सांगत त्यांनी, जास्त बोलायचे नाही, पण मुद्यावर बोलायचे, असे ठणकावून सांगितले. आटपाडी तालुक्यात चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती
गण असून सर्व ठिकाणी एकजुटीने आणि ताकदीने लढवायचे आहे.
विद्याताई मोटे पुढे म्हणाल्या की, निंबवडे जिल्हा परिषद गटातून माझी उमेदवारी सर्वप्रथम जाहीर झाली आहे. गटात कोणतीही तडजोड होणार नाही, हेही त्यांनी ठामपणे सांगितले. नाव न घेता त्यांनी पडळकर बंधूवर
जोरदार टीका केली. मी एकटीने त्यांना निंबवडे जिल्हा परिषद गटात अडकवून ठेवले आहे. उर्वरित तीन गट सर्वांसाठी खुले केले आहेत, असे सांगत त्यांनी राजकीय डावपेचांचा स्पष्ट इशारा दिला.
राजकारणाबाबत बोलताना विद्याताई मोटे म्हणाल्या, राजकारण हा माझा
पेशा नाही. पण माझ्या लोकांच्या अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण झाल्याच पाहिजेत. जनतेचा विश्वास हा माझ्यासाठी सर्वात मोठा भांडवल आहे. विकास, प्रामाणिकपणा आणि लोकांच्या प्रश्नांसाठी मी निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार सुहास बाबर यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना एकजूट, संघटन आणि बूथ पातळीवरील तयारीवर भर दिला. आगामी निवडणुका ताकदीने लढवून शिवसेनेचा झेंडा प्रत्येक गटात फडकवायचा असल्याचे त्यांनी सांगितले. तानाजीराव पाटील यांनीही कार्यकर्त्यांना आर्थिक व संघटनात्मक दृष्ट्या सज्ज राहण्याचे आवाहन केले. या मेळाव्यामुळे आटपाडी तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, विद्याताई मोटे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आगामी निवडणूक अधिकच चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा