करमाळा-- अलिकडे अनेक दडपडे तरुण शेतकरी शेतीत नवनवीन यशस्वी प्रयोग करताना दिसू लागलेत. पारंपारिक पद्धतीनं शेती न करता आधुनिक पध्दतीनं शेती करत भरघोस उत्पादन घेऊ लागलेत. काही उच्चशिक्षीत तरुणानीही नोकरीच्या मागे न लागता यशस्वी शेती करत असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. अशाच एका सिव्हिल इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलेल्या तरुणानं 'लाल केळी'च्या शेतीचा यशस्वी प्रयोग वाशिबे ता. करमाळा जि.सोलापूर येथे केला आहे. अभिजीत पाटील या तरुण अभियंता शेतकऱ्याचे नाव आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालक्यातील वाशिंबे या गावचा तो. त्यांनी लाल केळीचं यशस्वी उत्पादन घेतलं आहे.
*नोकरीच्या मागे न लागता शेती करण्याचा निर्णय*
अभिजीत पाटील हे करमाळा तालुक्यातील वाशिंबे गावचा तरूण. त्यांनी चार एकर क्षेत्रावर २०२० मध्ये लाल केळीची लागवड केली आहे. चार एकरातून त्यांनी आत्तापर्यंत 35 लाखांचं उत्पादन घेतलं आहे. हे उत्पन्न त्यांनी 13 महिन्यात घेतल आहे. गेल्या सात ते आठ वर्षापासून अभिजीत पाटील शेती करतात. पुण्यातील डी. वाय. पाटील महाविद्यालतून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं. त्यानंतर नोकरीच्या मागे न लागता 2015 पासून शेती करण्याचा निर्णय घेतला. आज लाल केळीच्या शेतीतून ते लाखो रुपयांचे उत्पादन घेत आहेत.
*2020 मध्ये केली होती लाल केळीची लागवड*
अभिजीत पाटील यांनी डिसेंबर 2020 मध्ये चार एकर क्षेत्रावर लाल केळीची लागवड केली होती. त्यानंतर जानेवारी 2022 मध्ये त्यांनी माल काढायला सुरुवात केली होती. टप्प्या टप्प्यानं त्यांनी या लाल केळीची विक्री केली. अभिजीत पाटील यांनी लाल केळीची पुणे, मुंबई, दिल्ली या ठिकाणी रिलायन्स आणि टाटा मॉलमध्ये विक्री केली.
*किलोला 55 ते 60 रुपयांचा दर*
लाल केळीला सध्या बाजारात मोठी मागणी आहे. सध्या एक किलोला 55 ते 60 रुपयांचा दर मिळत आहे. चार एकर क्षेत्रावर 60 टन माल निघाला होता. यातून त्यांना खर्च जाऊन 35 लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाल आहे. लाल केळी ही औषधी असते. त्यामध्ये पोषण गुणधर्म जास्त असतात. मेट्रो शहरामध्ये उच्च आणि श्रीमंत वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात लाल केळीला मागणी आहे. तसेच मोठ मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये देखील लाल केळीला मोठी मागणी आहे. पहिली चार एकर क्षेत्रावर लाल केळी होती. यावर्षी आणखी एक एकर क्षेत्रावरलाल केळीची लागवड केली आहे. गुणवत्तापूर्ण दर्जेदार केळीचे उत्पादक निघण्यासाठी शेणखत आणि इतर जैविक खताचा वापर करतात. वाफसा पद्धतीने पिकांना पाणी देतात. अंतर्गत मशागत वेळेवर करण्याकडे त्यांचे लक्ष असते. गुणवत्ता आणि दर्जेदार केळीचे उत्पादन निघण्यासाठी अनेक तज्ञाकडून त्यांनी मार्गदर्शन घेतले आहे. त्याप्रमाणे केळीच्या बागेत प्रत्यक्ष काम करतात. त्याचा परिणाम त्यांच्या उत्पादनातून त्यांना दिसून आला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा