विटा-- खानापूर विधानसभा मतदारसंघात त्यातही विसापूर सर्कल आणि आटपाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी रोखली नाही तर खानापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार निवडून येणार नाही, अशी खदखद माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी पक्षाच्या बुथ बैठकीत व्यक्त केली. राष्ट्रवादीचे आमदार शशीकांत शिंदे आणि आमदार अरूण लाड यांच्या समोर रोखठोक आपली व्यथा आणि खदखद पाटील यांनी मांडली. माजी आमदार सदाशिवराव पाटील गत चार वर्षापुर्वी राष्ट्रवादीत आले आहेत. तसे त्यांनी अद्याप राष्ट्रवादीकडून एकदाही विधानसभा लढवलेली नाही. पक्षापेक्षा स्वःताच्या गटबाधणीलाच आमदार पाटील यांचे पहिल्यापासून प्राधान्य राहिले आहे. त्यांच्या गटाचा परिघ विटा नगरपालिका बाहेर अपेक्षीत झालेला नाही. म्हणूनच त्यांना दरवेळी स्वतापेक्षा इतारावरील जास्त भिस्त ठेवावी लागते. ते विटा बाजार समितीच्या निवडणुकीत अधोरेखित झाले आहे.आटपाडीत राष्ट्रवादी मध्येही गटबाजी असल्याची तक्रार केली. आटपाडीतही त्यांचे धोरण अलिप्त राहिले आहे. उलट राज्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष सुरू असताना इथे मात्र स्वतःता पाटील पिता- पुत्र भाजपाशी मैत्रीचे संबंध ठेवून आहेत. अगदी ग्रामपंचायत आणि विकास सेवा सोसायटीच्या निवडण भाजपच्या व्यासपीठावर प्रचारात दिसलेत. भाजपचे खासदार संजय पाटील यांच्या सोबत त्याचा वावर तर उघडच आहे. अशा दुटप्पी भूमिकेमुळे त्याची खदखद पक्षाचे वरिष्ठ नेते कितपत मनावर घेतात,हे तितकेच महत्वाचं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे अनिल बाबर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. मतदारसंघात दोन तालुके आहेत. शिवाय तासगाव तालुक्यातील विसापूर मंडळातील गावेही आहेत. आटपाडीपेक्षा खानापूरचे मतदान जास्त आहे. विटा शहर माजी आमदार पाटील यांच्या पाठीशी नगरपालिका निवडणुकीत उभा राहते तर ग्रामीण भागात आमदार अनिल बाबर यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. मात्र, जिल्हा बँक, बाजार समिती आणि माणगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकी नंतर चित्र बदलताना दिसत आहे.
आ. बाबर यांना शह देण्यासाठी माजी आमदार पाटील गटाला ताकद देण्याचा प्रयत्न सुरू केलेत. काँग्रेसमध्ये प्रदेश उपाध्यक्ष असतानाही त्यांनी काँग्रेसचा त्याग करत 2०१९ ची निवडणूक अपक्ष लढवली, मात्र, विजय मिळवता आला नाही. भाजपचे गोपीचंद पडळकर मैदानात असूनही खासदार संजयकाका पाटील यांची मदत पाटलांना झाली. पण ती तोडकी पडते. म्हणून आत्ता खासदार संजय पाटील यांच्या सोबत स्नेह ठेवत त्याची ताकत आपल्या पदरात पाडून घेतानाच राष्ट्रवादीचे आमदार सुमनताई पाटील यांचे मापही पक्षाच्या माध्यमातून पदरात पाडून घेण्यासाठीच खदखद व्यक्त करून नवीन डाव रचला आहे. मात्र, राष्ट्रवादीतून विधानसभा लढविण्याची तयारी माजी आमदार आणि वैभव पाटील लढतील का?, हे त्याच वेळी स्पष्ट होणार आहे.
आ. बाबर यांचा ग्रामीण भागात थेट संवाद, संपर्क आहे. ही त्यांची जमेची बाजू असली तरी आटपाडी तालुक्यातही त्यांना दुसर्यावर विसंबुन राहावे लागते. कारण देशमुख वाड्यातून मिळणारी रसद यापुढे मिळणारं नाही तर आमदार गोपीचंद पडळकर यांचाही त्यांच्यावर रोष आहे. पण पडळकर पक्षाचे धोरण सोडून रोज टिकास्त्र सोडत असलेल्या राष्ट्रवादीला कितपत सहकार्य करतील, यावरही प्रश्न आहे. आमदार बाबर यांना यशवंत कारखान्याचे जुने दुखणे खासदार गटाशी आहे.
आमदार बाबर राष्ट्रवादीत असताना स्व. आरआर आबांच्या गटाचे म्हणून ओळखले जात होते. आजही आबा गटाची मदत त्यांना होत असते. यामुळेच पाटील गटांने राष्ट्रवादीतील फंदफितुरी रोखली गेली नाही तर पुढचा आमदार राष्ट्रवादीचा होणे कठीण असल्याची भविष्यवाणी केली. राष्ट्रवादीची आटपाडीत बाबर गटाच्या पाटलांना मदत, दुसरीकडे विसापूरमध्ये आबा गटाची आ. बाबर यांना मदत अशा स्थितीत आमदारकीचे राष्ट्रवादीचे स्वप्न पुर्ण होण्यावर खरच प्रश्न आहे. राष्ट्रवादीचे पक्ष विस्तारापेक्षा आपला गट कसा प्रबळ राहील याकडे लक्ष असल्याने विट्याच्या पाटलांची खंत नेतेमंडळी गांभीर्याने घेणार का हा प्रश्न निवडणुकीपर्यंत अनुत्तरितच राहणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा