**. " फोटू "
आज एक विपरीत घडलं होतं , सकाळपासूनच वाड्यातील सर्वांच्याच नजरा तिला इतक्या निरखून पहात होत्या की तिला साधं वावरतांना ही छातीवर प्रचंड ओझं आल्या सारखं वाटतं होतं .
अखेर दुपारचे घरातील सर्वांचे चहापाणी केल्यानंतर ती माजघरात गेली ,सदूंकातील खूप जपून ठेवलेलं लग्नातील जरिकाठाचं एकमेव लुगडं नेसून नवऱ्याने गुपचूप आणलेली पावडर चेहऱ्यावर घाईघाईने थापतांना अर्धिअधिक सारवलेल्या जमिनीवर सांडली अन् तिने कुणाला समजू नये म्हणून पायानेच पुसून ही टाकली.
लावलेली पावडर कळू नाही म्हणून दररोजचा पदर अधिक चेहऱ्यावर ओढून तिने माजघराचा दरवाजा उघडला मात्र ---
वाड्यातील पोरा सोरा पासून अगदी आजे सासऱ्या पर्यंत सर्वच जण तिला अगदी एखाद्या पानिपतच्या युध्दाच्या युद्ध भूमीवर चालल्या सारखे पहात होते .
आमचे " हे " ही लग्नातील भडक गुलाबी कुडता घालून कमालीच्या अवघडलेल्या अवस्थेत उभे असलेले दिसले .
सासुसासरे , वडीलधाऱ्या समोर एकमेकांशी बोलणे म्हणजे दहा खून केल्यासारखे त्यामुळे ह्यांनी नजरेने " चला " म्हणून खुणावले .
सासूसासऱ्या समोर वाड्या बाहेर पडताना हे अर्धा किलोमीटर पुढे नी मी त्यांच्या मागे खालमानेने चालत गेले . गावातील पारावर बसलेले वयोवृद्ध पुरषी अहंकाराला ठेच लागल्या सारखे तामसी नजरेने मला एखाद्या
" स्त्री मुक्तीची पुरस्कर्ती "
कडे पाहिल्यासारखे न्याहाळीत होते .
वेशीबाहेर नव्याने थाटलेला , लाल पिवळ्या रंगाने सजवलेल्या लाकडी फळीवर लिहिलेल्या
" फाॅरेनचा स्टुडिओ "
( माणसाचे गोऱ्या रंगात फोटु काढून मिळतेत )
असे वाचत आम्ही फळीआड गेलो,
आता गेलो तर तिन्ही भिंतीवर आम्हीच दिसायला लागलो , फक्त एक भिंत सोडून सगळीकडे आरसे .
पोरसवदा असलेला पोर आम्हाला
" जरा जवळ उभे रहा "
म्हणाला नी मला लाजल्या सारखेच झाले. पाठीमागे काळी मोठ्ठी घोंगडी तारेवर टाकलेली होती . स्टुडिओ वाला
" आता थोडं हसायचं असतं "
म्हणाला आणि मी ह्यांच्याकडे पाहिले तर काळ्यपाण्याची शिक्षा झाल्यागत यांचा चेहरा पाहून मलाच हसू आलं
काही कळायच्या आत आमचा फोटु निघाला .
हे एकदम विटाळ झाल्या सारखं एकदमच बाजूला झाले नी तडक घराकडे जायला लागले . मी ही आपलं नेहमी सारखं अर्धा किलोमीटरचे अंतर राखून मागे मागे जायला लागले .
" फाॅरेनचा स्टुडिओ " मधुन बाहेर पडतांना मात्र लोकांच्या नजरा वैजयंती माला दिसल्या सारख्या विस्फारत होत्या असे मला उगीच वाटून गेले .
फोटु कसा येईल ? या विचारातच स्वयंपाक करताना धुराने लाल झालेल्या डोळ्यात आज लवकरच झोप आली .
सकाळी अंगणातील सडा ,सासऱ्याला लागणारे पूजेचे सामान काढून दिले , रात्री उरलेल्या पोळ्यांचा " राणीचा दरबार " करून सगळ्यांची न्याहरीची सोय केली दरवाजातून " मालक " अशी हाक ऐकू आली जाऊन पहाते तर काय समोर तोच फाॅरेनचा स्टुडिओवाला दिसला नी उरात एकदम धस्स झालं .
आजेसासऱ्या पासून थेट सासुच्या हातात आलेला फोटु जगाचे आठवे आश्चर्य बघितल्याच्या अवस्थेत माझ्या ननदेंच्या हातात आला अन् मोठ्या जाऊबाई सह आम्ही माजघरात पळतच गेलो .
एखाद्या सावजावर तुटून पडावे असं आम्ही तिघींजणी फोटोवर तुटून पडलो .
ननंद म्हणाली
" वहिनी किती गं गोरी दिसते "
अन् मला आकाशच ठेंगणं झालं ,
" मला पण पुन्हा एकदा ---"
ननदेंचे वाक्य पूर्ण होण्याअगोदरच त्यांच्या पाठीवर रट्टा देत अचानक आलेल्या सासुबाई
" बस झाली तुमची ही थेर "
म्हणाल्या नी माजघरात कर्फ्यु लागल्या सारखी शांतता पसरली ,
काही का असेना पण माझा फोटू छान आला --!
( मुठभर शब्दांची पसाभर कथा )
सुभाष मधुकरराव तोंडोळकर
छ.संभाजीनगर.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा