मुख्य सामग्रीवर वगळा

चंद्रहार पाटलांच्या मनात चाललय काय?

डबल महाराष्ट्र केसरी मल्ल चंद्रहार पाटील यांनी कुस्तीच्या आखाड्यातून सेवानिवृत्ती घेऊन बैलगाडी शर्यत, महारक्तदान मोहीम या माध्यमातून सामाजिक कार्याच्या आखाडात मोठी उडी घेतली आहे. या कसलेल्या मल्लाने सामाजिक कार्याच्या आखाडात जोरदार सराव सुरू केल्याने इकडे राजकीय आखाड्यात खळबळ उडाली आहे. कारण सामाजिक आणि राजकीय आखाड्याचे नेहमीच जवळचे संबंध राहिले असून अत्यंत पुसट अशी रेषा आहे. त्यामुळे चंद्रहार पाटील सामाजिक आखाड्यातून राजकीय आखाड्यात हनुमान उडी घेऊन उतरण्यास वेळ लागणार नाही. सध्या तरी चंद्रहार पाटील यांनी संपूर्ण जिल्हा सामाजिक कार्याचा आखाडा म्हणून निवडला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात ते उतरल्यास काय होईल?, यावर शहरापासून ते गावगाड्या पर्यंत, वृद्धांपासून ते तरुणांपर्यंत चर्चा सुरू झाली आहे.                                    ‌पै. चंद्रहार पाटील यांनी कुस्तीच्या आखाड्यात उतरून "डबल" महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान जिल्ह्याला मिळवून दिला आहे. कुस्तीच्या आखाड्यातून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर चंद्रहार पाटील यांनी कुस्ती क्षेत्रातच भरीव काम करण्याच्या दृष्टीने मोठा आखाडा उभारला आहे. याशिवाय भविष्यात मोठे अंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्त्या आखाडा उभारण्याचे नियोजन करून प्रत्यक्ष कामही सुरू केले आहे. सहाजिकच त्यांच्याकडे युवाशक्तीची मसल पावर जबर मिळाली आहे.  या सामाजिक कार्याच्या जोडीला नुकतीच त्यांनी भव्य बैलगाडी शर्यत घेऊन सामाजिक कार्याची आणखी जोड दिली आहे. राज्यभर त्यांची बैलगाडी शर्यत चर्चेत आली. सध्या त्यांनी जिल्हाभर महारक्तदान शिबिर सुरू केले आहे. देशातील जवानांना रक्ताची टंचाई जाणवत असल्याने देशभक्ती आणि सामाजिक जाणिवेतून त्यांनी जिल्हाभर महारक्तदान शिबिर सुरू केले. कुस्तीच्या आखाड्यातून चंद्रहार पाटील यांनी सामाजिक कार्याच्या आखाड्यात दमदार उडी घेतली आहे. या आखाड्यात पहिल्याच दोन-चार डावावर जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. सामाजिक आणि राजकीय आशा दोन आखाड्यामध्ये फारसे अंतर नाही. या दोन्ही आखाड्यामध्ये पुसट अशी रेषा असून सामाजिक आखाड्यातून राजकीय आखाड्यात कोण आणि कधी गेला जाणार हे समजतही नाही.  सर्वच पक्षातील सर्वच प्रमुख नेते मंडळींना बैलगाडी शर्यतीला एकत्र करण्याबरोबरच 25 हजारावर शौकिनांना एकत्र करण्याची किमया त्यांनी साधली होती. त्यांच्या या शर्यतीची जिल्हाभर चर्चा झाली.                             सांगली जिल्ह्यात गावगाड्या पासून शहरापर्यंत ते तरुणापासून वृद्धापर्यंत चंद्रहार पाटील चांगलेच परिचित झालेले आहेत. सध्यातरी चंद्रहार पाटील यांनी सामाजिक कार्यासाठी संपूर्ण सांगली जिल्ह्यात आखाडा म्हणून निवडला आहे.तसे जिल्हाभर रक्तदान शिबिर घेतल्यातून दिसते. त्यामुळे राजकीय आखाड्यातील अनेक मल्लांच्या भुवया उंचावल्या आहेत. चंद्रहार पाटील यांनी राजकारणात येणार नसल्याचे सांगितले असले तरी त्यांची सुरू असलेली मशागत ही राजकीय आखाड्यात उतरण्याच्या दृष्टीने तयारीच सुरू केल्याचे बोलले जाते. लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. सध्या जिल्ह्याचे भाजपमधून संजयकाका पाटील खासदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. संजयकाका पाटील गेली नऊ वर्षे खासदार म्हणून काम करत असून ते डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. या डॅशिंग व्यक्तिमत्त्वातूनच त्यांचे भाजपातील अनेक आजी-माजी आमदाराशी सतत विविध विषयावरून खटके उडाले आहेत. त्यांचा आणि भाजपचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांचा वाद संबंध जिल्ह्याने पाहिला आहे. सध्या ते  पडळकराशी वाद मिटला असल्याचे म्हणत असले तरी प्रत्यक्ष निवडणुकी अगोदरच भाजपची उमेदवारी देताना पडळकर यांची खरी भूमिका समजेल. जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी काकाबाबत अनेक वेळा उघड नाराजी व्यक्त केली आहे.इकडे खानापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्यावर सातत्याने संजय पाटील टीकेच्या माध्यमातून गरळ ओकत असतात. आमदार बाबर यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी माजी आमदार सदाशिव पाटील यांच्याशी सलगी लपून राहिलेली नाही. संजय पाटील यांच्या या साऱ्या टीकाटिप्पणी आणि कृतीचा रिपोर्ट पक्षश्रेष्ठीपर्यंत अनेक वेळा पोहोचला आहे. संजय पाटील यांची भूमिका भाजपचा मित्रपक्ष असलेला शिंदे गटाची शिवसेनेला रुचणारी नक्कीच नाही. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार अजितराव घोरपडे, पालकमंत्री सदाशिवराव खाडे यांच्या मनातही काका बद्दल फार काही आपुलकी असल्याचे दिसत नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात जिल्ह्यातील भाजपमधील काही नेतेमंडळी नवीन उमेदवाराच्या शोधात असल्याचे आधी मधी चर्चा रंगते. संजय पाटील यांच्या ऐवजी दुसरा तेवढाच तोलामलाचा उमेदवार म्हणून भाजपाच्या वर्तुळात चंद्रहार पाटील यांचे नाव चर्चेत येऊ लागले आहे. त्यातच चंद्रहार पाटील यांनी जिल्हाभर सामाजिक कार्याची मशागत सुरू करून साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या या मशागतीच्या पडद्यामागे भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेतील नेतेमंडळींची मोठी ताकद असल्याचीही चर्चा आहे. चंद्रहार पाटील यांचा सध्या कोणत्या पक्षातील मातब्बर नेतेमंडळेशी जवळचा संपर्क ठेवून आहेत, यावर साऱ्यांचे लक्ष लागले आहे. ते लक्षात आल्यास सारे राजकीय डावपेच समोर येतील. त्यामुळेच त्यांचे नाव भाजपशी काहीजण जोडतात.                          चंद्रहार पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे कार्यकर्ते म्हणून मतदारसंघात ओळखले जातात. त्यामुळे चंद्रहार पाटील यांचे लोकसभा आखाड्याच्या नजरेतून राष्ट्रवादीशीही नाव जोडल जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सांगली लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितल्यास आश्चर्य कोणालाच वाटणार नाही. काँग्रेसचे विशाल पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सांगली लोकसभा मतदारसंघ मला सोडावा अशी जाहीर विनंती वजा मागणी केली आहे. या साऱ्या घडामोडी आणि जर तर च्या गोष्टी लक्षात घेऊन चंद्रहार पाटील यांनी मशागत करताना राजकीय आखाड्या बाबत मौन बाळगल आहे.          चंद्रहार पाटील यांच्या महारक्तदान शिबिराची सांगता आक्टोंबर महिन्यामध्ये करण्याचे नियोजन आहे. या नियोजन समारंभाला देशपातळीवरचा मोठा नेता आणण्याचे मनसुबे चंद्रावर पाटील यांचे आहेत. मग तो कोण, असेल हे त्यांनाच माहीत असणार आहे. त्यावेळी ते प्रचंड मोठे शक्ती प्रदर्शन करून सांगली लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवर दावा ठोकू शकतात. यावेळी जिल्ह्यातीलच कोण कोण आजी-माजी आमदार खरच त्यांच्या पाठीशी असणार हे ही स्पष्ट होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

करगणीत भाजपाला दुसरा धक्का विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

करगणी (ता. आटपाडी): करगणी गावच्या राजकारणात आज मोठी खळबळ उडाली असून, भारतीय जनता पार्टीला एकाच दिवसात दोन मोठे धक्के बसले आहेत. भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत जाधव यांनी आपल्या असंख्य तरुण समर्थकांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर 'भाजपच्या बालेकिल्ल्यात' शिवसेनेने लावलेल्या या सुरुंगामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दत्तात्रय पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. आज दिवसभरात भाजपच्या दोन वेगवेगळ्या गटांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने करगणीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.शिवसेनेची ताकद वाढली, भाजपचे 'पॉकेट' ढासळले ज्या भागात शिवसेनेला आजवर अपेक्षित मतदान मिळत नव्हते, त्याच भागातून आता विद्यमान लोकप्रतिनिधी आणि तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठ्या मताधिक्याची शक्यता निर्माण झाली आहे. करगणीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वा...

करगणी पंचायत समितीची अंतिम यादी

करगणी जिल्हा परिषद गटात गावनिहाय पडलेली मते